Thursday 26 May 2011

शहाणं बनून शहाण्या सारखं सगळेच जगत असतात-------


शहाणं बनून शहाण्या सारखं सगळेच जगत असतात
सुख दुःखाला आपल्या ते व्यवहारानं भागत असतात
व्यवहार हा विसरून सारा गाणं गाण्यात खरी मजा आहे
कुणासाठी तरी अस वेड बनून जगण्यात खरी मजा आहे
वर्षाकाळी आकाशात काळे मेघ जमणारच
वृष्टीतून सृष्टी माया आपल्यावर करणारच
पाऊस पडू लागला की शहाणी माणसं शिंकू लागतात
छत्री आणि रेनकोटच महत्त्व ते घोकू लागतात
एक वेडा गिरक्या घेत तेव्हा पावसात भिजत असतो
येरे येरे पावसा तुला देतो पैसा म्हणत असतो
पैशाच मोल शहाण्या इतकं कुणालाच कळत नसत
पण एक पैसा देऊन पाऊस घेणं त्यांना वळत नसत
व्यवहार हा विसरून सारा गाणं गाण्यात खरी मजा आहे
कुणासाठी तरी असं वेडं बनून जगण्यात खरी मजा आहे
वसंत आपल्या कुंचल्यानं सारी सृष्टी रंगवू लागतो
जीवन गाणं कोकीळ कुहु कुहु गाऊ लागतो
गाणं म्हणल की शहाणा माणूस सरसावणारच
कुठला राग कुठली बंदिश सांगून तुम्हाला घाबरवणारच
एक वेडा तेव्हा आपल्याच नादात गात असतो
आपल्याच तालात आपल्याच सुरात न्हात असतो
गाण्याचा कायदा शहाण्या इतका कुणालाच कळत नाही
पण बेधुंद होऊन गाण्याचा फायदा मात्र त्याला वळत नाही
व्यवहार हा विसरून सारा गाणं गाण्यात खरी मजा आहे
कुणासाठी तरी अस वेड बनून जगण्यात खरी मजा आहे

No comments:

Post a Comment