Thursday 26 May 2011

माय मराठी


महाराष्ट्राच्या तख्तावरती, सदैव धरिते स्निग्ध साउली,
कोण काय हो पुसता राजे, हीच आपुली माय माउली ॥
शूरवीरांची वीरश्री ही, संतमहंतांची तेजश्री
कवीवरांची ही काव्यश्री अन् वेदांची ही वेदश्री ॥
शिवरायांची ही मराठी बोली, टिळकांनी गीता रहस्यविली
भीम-फुल्यांनी बहुजनांत नेली, शाहिरांनी कवने सजविली ॥
ज्ञानियांची ज्ञानेश्वरी ही, तुकयांची ही अभंगवाणी
समर्थांचिये दासबोधे, नाथांघरी ही भरते पाणी ॥
साहित्याचा हिचा फुलोरा, अन् काव्याचा हा डोलारा
महाराष्ट्राच्या या देव्हारा, देवत्वचि जणू ये आकारा ॥
नतमस्तक मी हिच्या पाऊली, याचक मी गे तुझ्या राऊळी
गाऊ दे मला गान तुझे गे, प्रसन्न होई मराठ बोली, माय माउली ॥ 

No comments:

Post a Comment