Monday, 23 May 2011

माझी कविता

पहिली माझी कविता हो
प्रेयसीने वाचली-
अर्धी लिहिली होती तरी
अय्या कित्ती छान म्हणाली !
दुसरी माझी कविता हो
आईने ती' पाहिली ' -
कौतुकाने सांभाळूनी
पेटीतच ती ठेवली!
तिसरी माझी कविता हो
बापाने वाच(व)ली -
कागद मागे पुढे बघुन
कोरी बाजू वर ठेवली !
चौथी माझी कविता हो
दुसऱ्याने ती पाहिली-
खो खो हसून तिसऱ्याकडून
तीनशे मित्रात फिरवली!
पाचवी माझी कविता हो
बायकोने वाचली-
काही समजली नाही तिला
रद्दीतच तिने घातली!
सहावी माझी कविता हो
शेजाऱ्याने वाचली-
नेहमीप्रमाणे 'जळून ' त्याने
तुकडे करून भिरकावली !
सातवी माझी कविता हो
टीकाकाराने चाळली-
त्यालाही ना कळल्यामुळे
'सर्वोत्तम ' कविता ठरली !!
garade.sonu@gmail.com

No comments:

Post a Comment