Thursday, 7 July 2011

माझी कागदाची होडी....

आज सुटली वेगाने,
माझी कागदाची होडी....
भर पावसात होती,
हेलकावे घेत थोडी.....

पाणी आहे सारे सारे,
थेंब गार गार सारे....
कसे गोठवत आहे,
झोंबणारे न्यारे वारे....

माझ्या राहत्या घराला,
सारा पाण्याचा गराडा....
पण दुर गेला फ़ार,
पुर्‍या अंगाचा उकाडा....

सारी जमलेली पोरं,
पाण्यामध्ये चिंब चिंब...
वर पाहुन आभाळी,
मुखी टिपलेले थेंब...

भिजणारी झाडे होते,
उभी तिथंच निमुट....
पानं पानं होती मग्न,
सुखस्वप्नांचीच लुट....

सारी गल्ली सुनीसुनी,
फ़क्त पोरांचा घोळका...
पावसाच्या सरीमध्ये,
सुरु स्वच्छंद गलका.....

तो बरसावा म्हणुन,
मी केली लाडीगोडी......
फ़ार सुटली वेगाने,
माझी कागदाची होडी......

No comments:

Post a Comment