Tuesday 10 January 2012

शब्दाची किमया...


गरीब माणुस दारु पितो, 
मध्यमवर्गीय मद्यपान करतो, 
तर श्रीमंत लोक ड्रिंक्स घेतात!

काम केल्यावर गरीब माणसाला मजुरी मिळते,
काम केल्यावर मध्यमवर्गीय गृहस्थाला पगार मिळतो, 
तर काम केल्यावर ऑफिसर लोकांना सॅलरी मिळते!

गरीब माणुस करतो ते लफडं,
मध्यमवर्गी य माणुस करतो ते प्रेम,
तर श्रीमंत व्यक्ती करतात ते 
अफेअर!

शब्दाने शब्द वाढला की कविता होते, 
शब्दाने शब्द वाढला की भांडण होते 
शब्दाने शब्द वाढला की 

लेखकाची रॉयल्टी वाढते...

मैत्री


गवळ्याने दुधात पाणी घातलं होतं,
ते दूध माईनं चुलीवर ठेवलं होतं.
इकडे पातेल्यात मात्र निराळीच कहाणी होती,
दूध आणि पाण्याची मैत्री झाली होती.
पातेल्याची गर्मी वाढू लागली,
तशी दुधातल्या पाण्याची वाफ होऊ लागली.
हे पाहून दूध दु:खी झाला,
त्याने पाण्याला अटकाव केला.
सायीचा थर त्याने दिला ठेवून,
पाणी बिचारं त्यात बसलं अडकून.
इच्छा असताना त्याला दुधात राहता येईना,
सायीच्या भिंतीने बाहेर जाता येईना.
शेवटी कंटाळून दुधाला म्हणालं पाणी,
"जाऊ दे मला नाही तर नष्ट होऊ आपण दोन्ही. "
पाण्याचे शब्द ऐकून दूध त्याला म्हणाला,
"मरणाची भीती नाही आपल्या मैत्रीला. "
पाण्याने दुधाला खुप समजावलं,
पण दुधाने त्याचं एक नाही ऐकलं.
शेवटी दोघांनी एक निश्चय केला,
आणि त्यांना वेगळं करणारा जो अग्नी होता;
त्यालाच त्यांनी नष्ट केला.

Thursday 7 July 2011

नजरेत जे सामर्थ्य आहे

नजरेत जे सामर्थ्य आहे 

ते शब्दांना कसे कळणार ? 

पण प्रेमात पडल्याशिवाय 

ते तुम्हाला कसे कळणार ?

जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा

काहीतरी देण्यात महत्त्व असतं

कारण मागीतेला स्वार्थ

अन् दिलेलं प्रेम असतं

शब्दांनी कधीतरी माझी चौकशी केली होती

मला शब्द नव्हे त्यामागची भावना हवी होती ....v

आज अचानक भल्या पहाटे

"आज अचानक भल्या पहाटे
एक आठवण जागवून गेली
तुझे आणि माझे बंध
आपसूकच दाखवून गेली

सांग ना !
काय तुझे आणि माझे नाते
उमजेल का, कधी मला ते

करून करून विचार जेव्हा
कधी नव्हे ते थकले
गालांवरचा पाऊस मी
थांबवू नाही शकले

प्रेमाचे हे नाते अपुले
का आज एकतर्फी वाटले
पहाटेच्या या ऒल्या क्षणी
का कातरवेळ्चे ध्यास लागले

का तुझ्या डोळ्यात आज
शोधतोय मी पाऊस गाणे
धुक्याच्या या ओंजळीमध्ये
प्रेमरूपी दव थेंब माझे

सापडेल का या क्षणांना
कधी एक गोड किनारा
गालांवरच्या पावसाला
सावरणारा एक जिव्हाळा
सावरणारा एक जिव्हाळा"

पहिल्या पावसाची पहिली सर.....

पहिल्या पावसाची पहिली सर.....    

आता नुकतीच बरसली पहिल्या पावसाची पहिली सर
तुझ्या आठवणींचा स्पर्श हळुवार जाणवला अंगभर.....

पावसात भिजलेले क्षण आज पुन्हा डोळ्यात साठले
डोळ्यातल्या आसवांनी धावत पुन्हा आठवणींना गाठले.....

पावसासवे तुझ्या आठवणीही डोळ्यात बरसत राहिल्या
पावसाच्या पाण्याबरोबर त्याही नकळत गालावर धावल्या.....

माझ्या दु:खातही पाऊस आनंदाचे क्षण घेऊन कोसळला
विखुरलेल्या मनाला सावरत जुन्या आठवणीत मिसळला......

पावसाच्या सरी झेलत व्याकूळ मन भूतकाळात रमले
सुखद आठवणींना उजाळा देत दु:खही माझे क्षमले.....

पुन्हा एकदा हिरवळली मनात आठवणींची पाऊल वाट
पहिल्या पावसातल्या क्षणांची ओंजळ भरली काठोकाठ .....

ढगांकडे पाहत मी पावसाच्या सरी झेलत राहिलो
डोळ्यातले अश्रू लपवत बेभान होऊन भिजत राहिलो.....

आई गं...आई गं

आई गं...आई गं...... बछड्यासाठी धाव गं....... तुरुंगात मी माणसांच्या, घे मजकडे तु धाव गं....... खेळण्यास मी आलो होतो, हिरव्या गवता येथ भुलुनी.... मान पकडली या लोकांनी, हिरवा पाला मज दावुनी....... आण कुणा मज सोडविण्या, ओरड्तोय मी फ़ार फ़ार गं...... बुभुक्षित हे मानव जमले, करण्या मजला ठार गं....... आई...आई...ये ना गं, मम्मे..खम्मे....ये ना लवकर सांग ना कसायास या, बघ बांधतो खुंट्यास कसा...... बाळ तुझा चिमुकला आज, बघ धडपडतोय आज असा........ कोवळ्या बाळास खाण्या, जमाव अगदी निर्लज्ज आहे....... खवखवलेला सुरा कधीचा, कापण्यास कसा सज्ज आहे....... आई नको वाचवुस मजला, बस्स पाहीन तुला अखेरी...... दादास पण सांगुच नको, अंत असा माझा अघोरी....... आताच तर आलो ना गं. मग बोलावतो देव का गं........ मारल्या हाका जेथुनी मी, कापणार ही मान का गं....... आई...आई ये गं....ये गं, तो जवळ माझ्या येतोय..... आतातरी सोडव ना गं मला, तो प्राण हिरावुन नेतोय........ मम्मी.....आई......आई.....आई, दाबली ही मान माझी...... डोळ्यात तुला आठवतोय गं...... आ..... ---संतोष

लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...
समाजाचं अध:पतन, उघड्या डोळ्यांनी बघावं लागतं.
नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

कायदा सुव्यवस्थेला, कुणी भीत नाही राजे,
सुभेदाराची सूनही इथे सुरक्षित नाही राजे,
आया, बहिणी, लेकी, सुना, पवित्र राहिली नाहीत नाती,
शासन करणाऱ्या तलवारीचीच गंजून गेलीयेत पाती.

आपल्या आब्रूचे लक्तर, आब्रू झाकण्यासाठीच मागावं लागतं,
नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

हिंदवी स्वराज्य स्थापन करून, तुम्ही निघून गेलात राजे,
राष्ट्र प्रेमच स्फुल्लिंग करून, तुम्ही निघून गेलात राजे,
पण... या पेटलेल्या राष्ट्रप्रेमावर, स्वताचीच पोळी भाजणाऱ्या...
आणि आमचीच मतं घेऊन, शेवटी सत्तेने माजणाऱ्या.

गल्लीबोळातल्या पुढाऱ्याला, "रयतेचा राजा" म्हणावं लागतं,
नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

इंग्रज इथं दीडशे वर्षे राज्य करून निघून गेले,
भारतीयांचं काय पाणी, ते भारतात राहून बघून गेले,
भारतीय संस्कृतीच्या छाताडावर, आता पाश्चात्य संस्कृती नाचतेय,
महाराष्ट्रीय तुतारीच्या नावाखाली, इथे इंग्रजीचीच पिपाणी वाजतीये.

माय मराठी मरतेय राजे आणि इंग्रजीला पालखीत बघावं लागतं
नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

ज्यांच्याकडे पैसा आहे, त्याचं जगणं झालाय मस्त,
नी पोटासाठी राबनाऱ्याच, इथं मरण झालाय स्वस्त,
किड्यामुंग्यासारखी इथं, जगताहेत मानसं,
दिवसाढवळ्या, आपलं मरण बघतायेत मानसं.

वेदना असह्य होतात, म्हणून इच्छा मरण मागावं लागतं
नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

तुमच्या सारखा छत्रपती पुन्हा इथे झाला नाही,
पुन्हा कुठल्या जिजाऊ पोटी शिवबा जन्माला आला नाही.
घराघरातल्या जिजाऊ आता, करियर वूमन होत आहेत,
संस्कार करण्या ऐवजी पोराला, पाळणाघरात देत आहेत.

कुत्र आई नी पोरगं दाई कडे असलेलं बघावं लागतं
नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

आता एक करा राजे, या पुढे प्रेरणा कोणाला देऊ नका,
अन कृपा करून तुम्ही आमच्या स्वप्नातही येऊ नका..
काय सांगू राजे, आता इथल्या तरुणाई बद्दल बोलवत नाही,
नी तुमच्या आदर्शाच ओझ, इथल्या तरुण खांद्यांना पेलवत नाही.

कर्तव्य विसरून आमची तरुणाई, आपल्याच मस्तीत मग्न आहे,
घराघरातील मूर्ती तुमची, मनामनात भग्न आहे.

तुमच्या जयंतीला राजे, वर्षातून दोन वेळा नाचावं लागतं
नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

अन्याय, अत्याचार, अधर्मावर, इथल्या माणसाचं जीवापाड प्रेम जडलंय,
आणि हिंदू पतपातशाहीवर राजे,दहशतवादच सावट पडलंय.
बॉम्बस्फोटाच्या भीतीने, वारा सुगंध देत नाही,
नी आपल्याच मातृभूमीत राजे, मोकळा श्वासही घेता येत नाही.

गुंड सुटतात मोकाट आणि निर्दोशांना वर्षानुवर्ष न्यायालयात लढावं लागतं
नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

स्वराज्य इथ आहे राजे, पण सुराज्याचा पत्ता नाही,
म्हणतात ना... कौरव सारे माजले आहे आणि पांडवानाच सत्ता नाही
विरोध करण्याची हिम्मत जाऊन, निष्क्रीयताच पक्की मुरली आहे,
माझीही तलावर बोथट झालीये, आता फक्त शब्दांनाच धार उरली आहे.

समाजपरिवर्तनाच चक्र इथं, दुबळ्या हातांनाच फिरवावं लागतं
नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

ताठ मानेनं जगावं म्हटलं, तर राजे, आपलीच मानसं जगू देत नाहीत,
आणि भ्रष्टाचारमुक्त, अखंड भारतच स्वप्न बघू देत नाहीत.
आता हीच निष्क्रिय मानसं, माझा सर्वस्व लुटतील,
आणि तुमच्यावर कविता लिहिली म्हणून माझ्या जीवावर उठतील.

तरी बरं तुमचंच रक्त वाहतंय, माझ्या नसानसामधनं म्हणून लिहावं लागतं
नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

जातील राजे, नक्की जातील, "हे हि दिवस" एकदिवस,
स्वताच्या चुकांची जाणीव होयील, प्रत्येकालाच एकदिवस.

मात्र त्यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न हवेत करायला,
बुडणाऱ्याला काडीशिवाय, दुसरं काय लागतं तरायला?

पुन्हा एकदा त्याच डौलानं, भगवा झेंडा फडकणार,
कुणाच्याही चिथावणीने, आमची माथी नाही भडकणार.

आता आम्ही विचार करू, रायते साठी कष्ट करू,
समाज बदलण्यासाठी राजे, स्वतापासून सुरुवात करू.

तुमचेच वारस आम्ही राजे, फक्त रक्त उसळाव लागतं
हा समाज बदलण्यासाठीच राजे, या जगात जगावं लागतं...

                                                                                मुळ कवी- पुष्कर घाटपांडे